घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थ्यांची

घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थ्यांची पाच ते सहा वर्षांपासून फसवणूक?

३५ किलो धान्याऐवजी केवळ ५ ते १० किलो धान्य मिळत असल्याचा आरोप; दुकान परवानाधारकाच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

बिरसा संदेश न्युज 
प्रतिनिधि :-

वणी : - तालुक्यातील घोंसा येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२५/९८ मध्ये अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना नियमानुसार मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून लाभार्थ्यांना ३५ किलो धान्याऐवजी केवळ ५ ते १० किलो धान्य दिले जात असल्याची तक्रार असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आंबेडकरी जनआंदोलन, वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आली आहे.
घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानाचे परवानाधारक श्री. जी. एच. डंबारे हे १९९८ पासून रास्त भाव दुकान चालवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य पूर्ण प्रमाणात न देता कमी धान्य पुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लाभार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अनेक वर्षांपासून आर्थिक व मानसिक शोषण होत असल्याचेही तक्रारदारांनी म्हटले आहे. त्यामुळे संबंधित दुकानाच्या धान्य उचल व वितरण प्रक्रियेची तपासणी करून लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या

१. स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२५/९८ चे परवानाधारक जी. एच. डंबारे यांच्या १९९८ पासूनच्या धान्य उचल व वाटप नोंदवहीची चौकशी करण्यात यावी.
२. अंत्योदय योजनेतील धान्य वितरणातील कथित अनियमितता व घोटाळ्याची सखोल तपासणी करण्यात यावी.
३. चौकशीअंती आरोप सिद्ध झाल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करून धान्य वितरणाचे अधिकार काढून घेण्यात यावेत.

आठ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा

या प्रकरणी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय वणी यांच्याकडे निवेदन सादर करून योग्य चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने आठ दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास आंबेडकरी जनआंदोलन, वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
अंत्योदय योजनेतील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य पूर्ण प्रमाणात मिळावे आणि कथित गैरप्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
निवेदनकर्ते व आंदोलनातील सहभागी : अनिल तेलंग, प्रभाकर वाटेकर, रूमदेव मोहूर्ले, कल्पना ठाकरे, सुभाष पोयाम, गणेश गाते, पवन पवार, गौरव वाढई, निर्मला मोहूर्ले, अनुसया पवार, सुरेश प्रचाके आदी.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर