आदिवासी समाजाच्या शिक्षणासाठी
विशेष प्रतिनिधी
वणी :- आज आदिवासी समाजासमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. ग्रामीण भागातील अनेक जिल्हा परिषद व नगरपरिषद शाळा विद्यार्थ्यांच्या अभावामुळे बंद पडत आहेत किंवा त्यांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे खासगी शाळांचे जाळे वेगाने वाढत असून, त्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात फी भरावी लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये शिक्षण देणे परवडत नाही.
समाजातील जाणकार नागरिकांचे म्हणणे आहे की, आदिवासी समाजाचे भविष्य घडवायचे असेल तर केवळ सत्कार समारंभ, वाढदिवस, गौरव कार्यक्रम आणि मोठमोठे मेळावे घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठोस निधी उभारण्याची गरज आहे. समाजातील नेते, संघटना, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वसतिगृह सुविधा आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.अनेकदा एका दिवसाच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र हाच निधी गरीब व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरला गेला तर अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलू शकते. समाजातीलप्रत्येक सक्षम व्यक्तीने शिक्षणासाठी योगदान दिल्यास भविष्यात डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती आदिवासी समाजातून घडू शकतात.
"समाजाचा खरा सत्कार हा विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक देण्यात आहे, हार-फुलांच्या कार्यक्रमात नाही," अशी भावना अनेक समाजबांधव व्यक्त करत आहेत.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे ही काळाची गरज असून, समाजातील निधीचा मोठा हिस्सा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खर्च व्हावा, अशी मागणी समाजातून जोर धरत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा