वणी तालुक्यात वाढत्या भंगार
बिरसा संदेश न्यूज
वणी प्रतिनिधी
वणी :- प्रतिनिधी :वणी तालुक्यात सिंचन (एरिकेशन) सुविधा असलेली शेती मोठ्या प्रमाणात असून परिसरात अनेक कोळसा खाणी, डब्ल्यूसीएलच्या प्रकल्पांसह विविध कंपन्या कार्यरत आहेत. याशिवाय शहर व ग्रामीण भागात लहान-मोठी सुमारे ४० भंगार खरेदी-विक्रीची दुकाने असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भंगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मात्र, अलीकडील काळात शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलचे साहित्य, बॅटऱ्या, पीव्हीसी व स्प्रिंकलर पाईप, इलेक्ट्रिक केबल, मोटार साहित्य तसेच कंपन्या व खाणींमधील लोखंडी साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. चोरीचा माल विविध मार्गांनी भंगार म्हणून विकला जात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण भागातून अनेक भंगार व्यापारी व फिरते भंगार खरेदीदार साहित्य गोळा करून वणीतील मोठ्या भंगार विक्रेत्यांकडे विक्री करतात. मात्र, खरेदी केलेले भंगार कायदेशीररित्या मिळवलेले आहे की चोरीचे आहे, याची पडताळणी कितपत केली जाते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या मते, भंगार खरेदी-विक्री करताना मालाची मूळ मालकी, बिल, ओळखपत्र व नोंदवही यांची काटेकोर तपासणी झाल्यास चोरीच्या घटनांवर आळा बसू शकतो.
जबाबदारी कोणाची?
या वाढत्या प्रकारांमुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
चोरी रोखण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आहे का?
भंगार खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मालाची पडताळणी करणे आवश्यक नाही का?
कंपन्या व शेतकऱ्यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी का?
स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित विभागांनी भंगार व्यवसायावर नियमित नियंत्रण ठेवावे का?
याबाबत संबंधित प्रशासन, पोलीस विभाग, उद्योग व्यवस्थापन व भंगार व्यापारी संघटनांनी संयुक्तपणे उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नागरिकांची मागणी
वणी तालुक्यातील शेतकरी, उद्योग क्षेत्र व नागरिकांनी भंगार खरेदी-विक्रीची नियमित तपासणी, संशयास्पद व्यवहारांवर कारवाई आणि चोरीच्या मालाचा मागोवा घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. अन्यथा शेतकरी व उद्योग क्षेत्राला आर्थिक फटका बसत राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
"चोरीला जाणारे साहित्य व भंगार बाजार यावर प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा