साधनकरवाडीतील रस्त्याच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक;
१ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा; सरपंचांकडून स्वतःच्या लेआउटसाठी निधी वापरल्याचा गंभीर आरोप डॉ. शैलेश गजानन आत्राम
बिरसा संदेश न्यूज
वणी प्रतिनिधी
वणी :- तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साधनकरवाडी येथील नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करत गटविकास अधिकारी, पंचायत समिती वणी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. तसेच शासनाच्या विकास निधीचा कथित दुरुपयोग करून काही निवडक भागांमध्ये कामे करण्यात आल्याचा गंभीर आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.निवेदनानुसार साधनकरवाडी परिसरात डॉ. किशोर मोघे यांच्या घरापासून बुऱ्हाणी यांच्या घरापर्यंतचा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून या मार्गाच्या बांधकामासाठी ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करण्यात येत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीदेखील ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित अधिकारी वेळकाढूपणा करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवा ग्रामपंचायतीचे सरपंच स्वतःच्या लेआउट व्यवसायाच्या विकासासाठी शासकीय निधीचा वापर करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील काही भागात डांबरीकरण व रस्त्यांची कामे करण्यात आली असली तरी ज्या ठिकाणी प्रत्यक्षात रस्ता व नाली बांधकामाची गरज आहे त्या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून शासन निधीचा वापर नेमका कुठे व कशासाठी करण्यात आला याची माहिती जाहीर करावी तसेच दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीआहे.दरम्यान प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य कार्यवाही न केल्यास साधनकरवाडीतील नागरिक १ जुलै २०२६ पासून आमरण उपोषणास बसतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे पंचायत समिती व जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा