मृग नक्षत्र सरले तरी पावसाचा पत्ता नाही; कपाशी पेरण्या

मृग नक्षत्र सरले तरी पावसाचा पत्ता नाही; कपाशी पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतेच्या गर्तेत
बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च; पावसाअभावी शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले

बिरसा संदेश न्यूज
प्रतिनिधी

वणी :- मृग नक्षत्र सुरू होऊन अनेक दिवस उलटले तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या आशा आता आभाळाकडे लागल्या आहेत.यंदा शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा साठवलेल्या पैशांतून बियाणे, खते आणि शेती मशागतीची तयारी पूर्ण केली आहे. मात्र पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतात बियाणे टाकणे धोक्याचे ठरत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी प्रतीक्षा करत असून दिवसेंदिवस त्यांची चिंता वाढत आहे.
आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात पावसाचा उशीर झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यामुळे अतिरिक्त खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. काही भागात विहिरी व बोअरवेलचे पाणीही कमी होत असल्याने शेतीसह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास परिस्थिती सुधारू शकते. मात्र पाऊस आणखी लांबल्यास कपाशीसह सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिकांवरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी शासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक मदत, पीकविमा प्रक्रियेत सुलभता आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे उपाय तातडीने राबवावेत, अशी मागणी केली आहे.
"पाऊस पडेल आणि शिवार हिरवेगार होईल" या आशेवर आजही बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधी घरावर अधिकार नसला तरी बळजबरीने

वणी नगर परिषद निवडणुकी

वांजरी येथील अनुसुचित जाती व