मुदत संपलेल्या ठेक्याच्या नावाखाली वसुली सुरूच!
२० लाख ६५ हजार ५०० रुपयांचा ठेका; मुदत संपून दोन महिने उलटले तरी दुकानदारांकडून २० ते ३० रुपयांची वसुली सुरूच! पावती नाही, पैसे न दिल्यास रहल दुकान उचलण्याच्या धमक्या?
बिरसा संदेश न्युज
वाणी प्रतिनिधि :-
वणी :- वणी नगरपरिषदेच्या कर विभागांतर्गत सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी २० लाख ६५ हजार ५०० रुपयांचा ठेका देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, संबंधित ठेक्याची मुदत सुमारे दोन महिन्यांपूर्वी संपुष्टात आली असतानाही शहरातील लहान-मोठ्या दुकानदारांकडून अद्याप वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, दुकानदारांकडून २० ते ३० रुपयांपर्यंत रक्कम वसूल केली जात असल्याचे सांगण्यात येत असून, अनेक दुकानदारांना पैसे दिल्यानंतर अधिकृत पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी पैसे देण्यास नकार दिल्यास दुकानातील साहित्य उचलून फेकून देण्याची धमकी दिली जात असल्याचाही आरोप आहे.
छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक भुर्दंड!
दिवसभर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या हातगाडीधारक, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि किरकोळ व्यावसायिकांना अशा वसुलीचा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. आधीच महागाई आणि मंदीमुळे अडचणीत असलेल्या छोट्या व्यावसायिकांवर या प्रकारामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
मुदत संपल्यानंतर वसुलीचा अधिकार कोणाच्या आदेशाने?
संबंधित ठेक्याची मुदत संपल्यानंतर ठेकेदाराला वसुली सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे का? मुदतवाढ दिली असल्यास त्याचा अधिकृत आदेश कुठे आहे? वसुलीची रक्कम नगरपरिषदेकडे जमा होते की नाही? पावती न देता पैसे घेण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने ठेक्याचा करारनामा, मुदतवाढीचा आदेश, वसुलीचे नियम, पावती पुस्तके आणि जमा झालेल्या रकमेचा लेखाजोखा सार्वजनिक करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुख्याधिकारी आणि कर विभागाने तातडीने लक्ष द्यावे!
वणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि कर विभागाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मुदत संपलेल्या ठेक्याच्या नावाखाली सुरू असलेल्या वसुलीची कायदेशीरता तपासावी. पावती न देता पैसे वसूल केले जात असल्याचे आरोप खरे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी. तसेच दुकानदारांना धमकावून त्यांचा व्यवसाय विस्कळीत करणाऱ्यांवरही योग्य ती कारवाई करावी.
सामान्य दुकानदारांनी आपला व्यवसाय करायचा की रोजच्या वसुलीच्या त्रासाला सामोरे जायचे?
वणी नगरपरिषद प्रशासन या गंभीर तक्रारींची दखल घेऊन छोट्या व्यावसायिकांना न्याय देणार का? की ठेकेदारांची मनमानी अशीच सुरू राहणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा