क्लोजर नोटीस बजावलेल्या कोळसा डेपोवर

क्लोजर नोटीस बजावलेल्या कोळसा डेपोवर तात्काळ कारवाई करा!

५ नोव्हेंबरला लाल पुलिया चौफुली येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा; लाल पुलिया संघर्ष समितीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन

बिरसा संदेश न्युज 
प्रतिनिधि :- 

वणी, यवतमाळ : चिखलगाव ते सोमनाडा परिसरातील कोळसा डेपोंमुळे वाढत असलेले धूळप्रदूषण अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक अपघातांचा धोका आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वेक्षणानंतर ज्या कोळसा डेपो धारकांना Closure Direction Notice बजावल्या आहेत त्या डेपोवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून बंद व सील करण्यात यावे अशी मागणी लाल पुलिया संघर्ष समिती व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात समितीचे निलेश सोनटक्के व परिसरातील नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

सर्वेक्षणानंतरही डेपो सुरू असल्याचा आरोप

निवेदनानुसार दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत संबंधित कोळसा डेपोचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही डेपो धारकांना ऑगस्ट २०२६ मध्ये क्लोजर डायरेक्शन नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नागरिकांना मिळाली आहे.मात्र नोटीस बजावण्यात आलेले काही कोळसा डेपो अद्याप सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा आणि प्रशासनाच्या निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘नो ऑपरेशन’ निर्देशांची अंमलबजावणी कुठे?

या प्रकरणी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संबंधित कोळसा डेपोचे कामकाज सुरू ठेवू नये असे ‘NO OPERATION’ निर्देश देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तरीही परिसरात कोळसा डेपोचे कामकाज सुरू असल्याचा आरोप समितीने केला असून, प्रशासनाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

प्रदूषणामुळे शेतकरी व नागरिक त्रस्त

कोळसा डेपोमधून उडणारी धूळ, अवजड वाहनांची वाहतूक आणि रस्त्यांवरील अपघातांचा धोका यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही सातत्याने करण्यात येत आहेत.लोकवस्तीच्या परिसरातून कोळसा डेपो स्थलांतरित करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीही विविध विभागांकडे केली असून ग्रामपंचायत स्तरावर ठराव करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

५ नोव्हेंबरला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी लाल पुलिया चौफुली वाय-पॉईंट चिखलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना निवेदनातून देण्यात आली आहे.आंदोलनापूर्वी संबंधित कोळसा डेपोवर कायदेशीर कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या

* क्लोजर नोटीस बजावलेल्या व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या कोळसा डेपोचे कामकाज तात्काळ बंद करून कायद्यानुसार सील करण्याची कारवाई करावी.

* जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘NO OPERATION’ निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी करावी.
* आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई प्रभावीपणे राबवावी.
* सर्वेक्षण अहवाल, क्लोजर नोटिसा आणि कारवाईचा तपशील वरिष्ठ अधिकारी व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवावा.
* करण्यात आलेल्या कारवाईचा लेखी अहवाल लाल पुलिया संघर्ष समिती व परिसरातील नागरिकांना द्यावा.

“नागरिकांना बैठका आश्वासने आणि केवळ कागदी कारवाई नको; प्रत्यक्ष कृती हवी आहे". अशी भूमिका समितीने मांडली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आणि पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने ठोस कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनकर्ते : -लाल पुलिया संघर्ष समिती:-  निलेश   सोनटक्के, अमित संते, प्रदीप खेकारे,  संकेत काळे, शेखर सातपुते,  सागर जाधव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थ्यांची

वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर