बँकेची भिंत फोडली, तिजोरी ओढून नेली अन्

बँकेची भिंत फोडली, तिजोरी ओढून नेली अन् सव्वासहा लाखांवर डल्ला!

पाटन येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये धाडसी चोरी; ६ लाख २४ हजार ९२९ रुपयांचा मुद्देमाल लंपास, सीसीटीव्हीचा डीव्हीआरही गायब

बिरसा संदेश न्युज
प्रतिनिधि :-

 झरी-जामणी :- तालुक्यातील पाटन येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत बँकेच्या सुरक्षेला आव्हान दिले आहे. बँकेच्या मागील भिंतीला भगदाड पाडून आत प्रवेश करणाऱ्या चोरट्यांनी लोखंडी तिजोरी बाहेर ओढून नेली आणि काही अंतरावर फोडून त्यातील लाखोंची रोकड लंपास केली. मंगळवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
भिंतीला भगदाड, तिजोरीला लक्ष्य!

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी, दि. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता बँकेचे नियमित कामकाज आटोपून शाखा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचारी घरी गेले.
रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर थेट लोखंडी तिजोरीला लक्ष्य करत ती बाहेर काढली. तिजोरी बँकेपासून सुमारे २५० ते ३०० फूट अंतरावर ओढून नेल्यानंतर फोडण्यात आली. त्यातील रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

६ लाख २४ हजार ९२९ रुपयांचा मुद्देमाल चोरीला

मंगळवारी सकाळी बँक उघडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शाखा व्यवस्थापक जयंत रमेश गोडे यांच्या माहितीनुसार, तिजोरीतील ६ लाख ९ हजार ९२९ रुपये रोख चोरीला गेले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही चोरट्यांनी लंपास केला आहे. डीव्हीआरची किंमत १५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
अशा प्रकारे एकूण ६ लाख २४ हजार ९२९ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान

घटनेनंतर शाखा व्यवस्थापकांनी पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. बँकेची भिंत फोडून तिजोरी बाहेर नेण्यापर्यंत चोरट्यांनी केलेले नियोजन पाहता या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सीसीटीव्हीचा डीव्हीआरही गायब असल्याने तपासात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अज्ञात चोरट्यांचा माग काढून चोरीचा उलगडा करणे आणि लंपास केलेली रक्कम हस्तगत करणे, हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! पाटन येथील या धाडसी चोरीने ग्रामीण भागातील बँकांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, चोरट्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थ्यांची

वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर