झरी तालुक्यातील सात गुणवंत शिक्षकांचा गौरव!
झरी तालुक्यातील सात गुणवंत शिक्षकांचा गौरव! ‘आयडॉल शिक्षक’ पुरस्काराने शिक्षण क्षेत्राचा मान उंचावला
पंचायत समिती झरी येथे विशेष सत्कार सोहळा; शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
बिरसा संदेश न्युज
प्रतिनिधि :-
झरी-जामणी :- झरी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ घडवून आणण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती झरी येथे ‘आयडॉल शिक्षक’ सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या उपक्रमांतर्गत सन २०२६ साठी झरी तालुक्यातील सात शिक्षकांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
शिक्षण विभाग, पंचायत समिती झरी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात निवड झालेल्या शिक्षकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. गुणवंत शिक्षकांच्या कार्याचा अनुभव इतर शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवून शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सात शिक्षकांचा गौरव
‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांमध्ये श्री. विनोद तात्याजी मडावी, श्री. देवराव शिवराम मेश्राम, श्री. तुळशीदास बापूराव आवारी, श्री. विठोबा गणपत भोयर, श्री. चंद्रशेखर दादाजी कोसरे, श्री. अरविंद रेवा जाधव आणि श्रीमती रेखा निळकंठ झाडे यांचा समावेश आहे.
या सर्व शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सूक्ष्म नियोजनाचे आवाहन
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश खैरनार यांनी झरी तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी आयडॉल शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, महादीप परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची दर्जेदार तयारी करून घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच फाउंडेशनल लिटरेसी अँड न्यूमरेसी (FLN) अंतर्गत विद्यार्थ्यांना निर्धारित संपादणूक पातळीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अध्यापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याला गटशिक्षणाधिकारी श्री. निलेश खैरनार, विस्तार अधिकारी श्री. मोहन काटकर, केंद्रप्रमुख श्री. चेतन सुरपाम, श्री. विपिन मुसकावार, श्री. मंगेश यमसनवार, श्री. श्रीनिवास कटकमवार, श्री. जगदीश आर. मुरवार, श्री. तुळशीदास आवारी तसेच बीआरसी साधन व्यक्ती श्री. मंगेश फुटाणे, श्री. संतोष ठावरी आणि महादीप समन्वयक श्री. गजानन आकुलवार उपस्थित होते.
गुणवंत शिक्षकांच्या सन्मानामुळे झरी तालुक्यातील शिक्षक वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा