वणीतील WCL सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा उलगडा

वणीतील WCL सुरक्षा रक्षकाच्या खुनाचा उलगडा; आरोपी २४ तासांत पोलिसांच्या ताब्यात!

तक्रार घेण्यावरून झालेल्या वादातून निर्घृण हत्या; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची यशस्वी कारवाई

बिरसा संदेश न्युज 
प्रतिनिधि :-

वणी :-  दि. २ नोव्हेंबर २०२६ : वणी तालुक्यातील कोलारपिंपरी येथील प्रगती नगर कॉलनी परिसरात WCL सुरक्षा रक्षकाचा खून झाल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी अवघ्या २४ तासांत उलगडा केला आहे. सुरक्षा रक्षकाच्या हत्येप्रकरणी अंचल मोहन उईके (वय २८, रा. प्रगती नगर कॉलनी, कोलारपिंपरी, वणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

मृतक ओमप्रकाश हिरा प्रसाद (वय ४५) हे कोलारपिंपरी येथील क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री कार्यालय परिसरात त्यांच्या डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर गंभीर वार करून अज्ञात आरोपीने त्यांची हत्या केली होती.
या घटनेप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११५९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रार घेण्यावरून वाद; वादाचे रूपांतर हत्येत

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री कॉलनी परिसरात रानडुकरांचा कळप आल्याने मोटारसायकलवरून पडल्याच्या कारणावरून आरोपी अंचल उईके हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेला होता.
रात्री सुमारे १०.४० वाजता कार्यालयात उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षक ओमप्रकाश प्रसाद यांनी त्याला सकाळी कार्यालयात येण्यास सांगितले. मात्र “माझी तक्रार आत्ताच घ्या” असा आग्रह धरत आरोपीने वाद घातला. या वादातून आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर वार करून त्यांचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना आरोपी घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम राबवून दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अंचल उईके याला ताब्यात घेतले.
सखोल विचारपूसदरम्यान गुन्ह्याबाबत माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वणी पोलीस ठाणे करीत आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, गजानन राजमलु , पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, शिवशंकर कायंदे, सागर इंगळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी होते.  

२४ तासांत आरोपीला ताब्यात घेत खुनाचा उलगडा केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीची चर्चा होत आहे.

बातमी स्रोत : पोलीस अधीक्षक कार्यालय, यवतमाळ यांची दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजीची प्रसिद्धीपत्रक माहिती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपूर्ण राहिलेली कला, काळाच्या पडद्या आड

घोंसा येथील स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय लाभार्थ्यांची

वणीत एमडी ड्रग्ज रॅकेटवर